जिल्हाधिकाऱ्यांचा मॅसेज अन.. बालकल्याण विभागाची टीम मंडपात!

 

जळगाव,प्रतीनिधी । येथील हरिविठ्ठल नगर परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांना मॅसेजद्वारे मिळाली, आणि तात्काळ महिला व बालकल्याण विभागाचे पथक पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच होणारा बालविवाह वेळेत रोखला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी यांना मॅसेजद्वारे महिला व बालकल्याण विभागाचे प्रमुख विजयसिह परदेशी यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि विजयसिह परदेशी यांनी महिला आणि बालकल्याण विभागाच्या पथकाला तसेच चाईल्ड हेल्प लाईन पथकाला सूचित केले.

तात्काळ रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना माहिती दिली व पोलीस कर्मचारी बंदोबस्ताला मागितले. पोलिसांचे वाहनात पोलिसांसह पथक घटनास्थळी राजीव गांधी नगर परिसरातील ओंकार कॉलनी येथे दुपारी १ वाजेला पोहोचले. तेथे जाऊन वधू व वराची सर्व शासकीय कागदपत्रे तपासली. त्यानुसार वधू ही अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. तिचे वय – १७ वर्ष, २४ दिवस होते. तर वराचे वय २२ वर्षे होते. दोघेही हरिविठ्ठल नगर परिसरातील राहणारे होते. दोघं वधू-वर आणि नातेवाईकांना रामानंद नगर पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यानुसार दोन्ही कुटुंबियांकडून लेखी जवाब लिहून घेतले. यामध्ये मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतरच विवाह करू असे त्यांनी लिहून घेतले.

विवाहस्थळी मुलीचे आई-वडील उपस्थित नव्हते. त्यांचा या विवाहाला विरोध असल्याची मात्र,मुलीची विवाहाला संमती असल्याची माहिती पथकाला मिळाली. बालविवाह हा गुन्हा असून त्याचे तोटे पथकाने नातेवाईकांना समजवून सांगितले. वधू – वर आणि नातेवाईकांचे पथकाने समुपदेशन करून, त्यांना समज देत, प्रतिबंधात्मक कारवाई करीत सोडून दिले.

कारवाई करणाऱ्या पथकामध्ये जिल्हा बाल संरक्षण विभागाचे पथक योगेश मुक्कावार, समुपदेशक पांडुरंग पाटील, चाइल्ड हेल्पलाइनचे भानुदास येवलेकर, समुपदेशक सौ. जोशी, पोलीस अधिकारी रुपेश ठाकूर व त्यांचे कर्मचारी यांचा समावेश होता. बालविवाह हा गुन्हा असून नागरिकांनी सतर्क राहून असे प्रकार कुठे घडत असेल, तर जिल्हा महिला आणि बालकल्याण विभागाला माहिती द्यावी असे आवाहन विभागाचे प्रमुख विजयसिंग परदेशी यांनी केले आहे.

Protected Content