जळगाव : प्रतिनिधी । : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील केंद्रांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी ‘फ्रंटलाईन’ योध्यांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पहिल्या तर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दुसऱ्या क्रमांकावर ‘कोविशील्ड’ लस घेऊन लसीकरण सुरक्षित असल्याचे सांगितले.
जग कोरोना महामारीने ग्रासले आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ लस तयार झाली आहे. जिल्ह्यात या लसी उपलब्ध झाल्या आहेत. शासकीय रुग्णालयात सकाळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचे आगमन झाले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी त्यांचे स्वागत करून लसीकरण मोहिमेविषयी माहिती सांगितली.
ओपीडी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोरोना लसीकरण केंद्रात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना संगणकावर नोंद झाल्यावर डाव्या दंडावर अधिपरिचारिका गायत्री पवार यांनी लस टोचून ‘फ्रंटलाईन वोरीयर’ लसीकरणाचा प्रारंभ केला. त्यानंतर डॉ. मुंढे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधिक्षक नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी अनुक्रमे पहिल्या आठ मध्ये लस घेतली. लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले कि, कोरोना प्रतिबंधाची “कोविशील्ड” हि लस पूर्णतः सुरक्षित आहे. त्यासाठी आरोग्यासह कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असणारे (फ्रंटलाईन) सर्वानी वेळेत लसीकरण करून घ्यावे. डॉ. मुंढे यांनीदेखील, कोरोना प्रतिबंधाची लस सुरक्षित असल्याचे सांगत लस घेण्यासाठी प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे असे आवाहन यावेळी केले.
यावेळी प्रशासकीय अधिकारी डॉ. यु.बी.तासखेडकर, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (गृह) दिलीप पाटील, मोटार परिवहन विभागाचे पो.नि. समीर मोहिते, राखीव पो.नि. संतोष सोनवणे, जिल्हापेठचे पो.नि. विलास शेंडे, शनिपेठचे पो.नि. विठ्ठल ससे, रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, डॉ. बाळासाहेब सुरोशे, डॉ. अनुराधा वानखडे, अधिसेविका कविता नेतकर, पीएसआय भरत चौधरी उपस्थित होते.
याठिकाणी सार्वजनिक आरोग्य परिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचारिका जयश्री वानखेडे, गायत्री पवार, कर्मचारी नितीन राठोड, सुरक्षा अधिकारी अजय जाधव, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, जनसंपर्क सहाय्यक विश्वजित चौधरी, अभिषेक पवार यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.