मुंबई वृत्तसंस्था । “महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा सुरु केल्या जातील. महाराष्ट्रात पुन्हा जिम, शॉपिंग मॉल सुरु करावेत का, याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. मात्र लोकल ट्रेन सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
मुंबईत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यात आयसीयू बेड्सची कमतरता, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग, प्लाझ्मा दान यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
“नालासोपारा, वसई, विरार या भागातून मोठ्या संख्येने लोक मुंबईत कामाला येतात. त्यामुळे लोकल सेवा सुरु कराव्यात अशी मागणी अनेकजण करत आहे. लोकांची मागणी रास्त आहे. मात्र ट्रेनमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नाही. त्यामुळे ट्रेन सुरु करायच्या की नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,” असे राजेश टोपे म्हणाले.
क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स
“राज्यातील क्वारंटाईन सेंटरमध्ये होणाऱ्या घटना निंदनीय आहे. या सर्व घटनांनी माणुसकीला काळिमा फासल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीर क्वारंटाईन सेंटरबाबत लवकरच गाईडलाईन्स तयार केल्या जातील. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे रुम किंवा वॉर्ड करण्यात येतील. तसेच यात अंतरही ठेवलं जाईल. जर यासाठी काही नियम बदलावे लागले तर तेही आम्ही बदलू. तसेच या सर्व घटनांना जे जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई केली जाईल,” असे राजेश टोपे यावेळी म्हणाले.