जिंदगी फाऊंडेशनच्या हेल्पलाईन नंबरचे मंत्री यशोमती ठाकूर यांच्याहस्ते लोकार्पण

 

जळगाव प्रतिनिधी । जिंदगी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांची जळगाव दौऱ्यात भेट घेतली. यावेळेस जिंदगी फाऊंडेशनच्या महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबरचे लोकार्पण यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांना कुणीही मानसिक किंवा शारीरिक त्रास देत असल्यास तसेच आत्महत्येचा विचार आल्यास त्या जिंदगी फाउंडेशनच्या हेल्पलाइन नंबरवर २४ तासात कधीही संपर्क साधू शकतात, अशी माहिती मंत्री ठाकूर यांना अध्यक्ष सुश्मिता भालेराव यांनी दिली.
शाळा आणि कॉलेजच्या किशोरवयीन मुला-मुलींसाठी सक्तीचे लैंगिक शिक्षण राज्य सरकारने सुरू करावे या आशयाचे निवेदन सुद्धा यावेळेस जिंदगी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमती ठाकूर यांना दिले. जिंदगी फाउंडेशन दोन वर्षांपासून शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आणि समुपदेशन करत असलेल्या कार्याची श्रीमती ठाकूर यांनी माहिती जाणून घेतली. यावेळेस महिला सुरक्षितता या विषयावर जिंदगी फाउंडेशनने तयार केलेले पोस्टर यशोमती ठाकूर यांना भेट करण्यात आले. या कार्यक्रमाला आ.शिरीष चौधरी, जिंदगी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुष्मिता भालेराव, सचिव अजय पाटील तसेच सदस्या निशिगंधा भालेराव हे उपस्थित होते.

Protected Content