चोपडा, प्रतिनिधी । जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीचा एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केला होता. याप्रकरणी श्री संत सावता माळी युवक संघाच्या जिल्हा महिला आघाडीतर्फे तहसीलदार यांना निवेदन देत मारेकऱ्याला फाशी द्या, अशी मागणी करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीचा एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते. आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले. लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीच्या दुर्दैवी अंत बघावा लागला. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षितता वाटली पाहिजे प्रत्येक स्त्री ला निर्भयपणे जगता आले पाहिजे, असा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून मुख्यमंत्री यांनी याकडे विशेष लक्ष देऊन अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या घडलेल्या घटनेचा श्री संत सावता माळी युवक संघ, महाराष्ट्र राज्य च्या जळगाव जिल्हा महिला आघाडीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे. हा खून खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदन तहसीलदार अनिल गावित यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी जळगाव जिल्हा महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा संध्याताई महाजन, चोपडा महिला आघाडीउपाअध्यक्षा सरलाताई माळी, महिला आघाडी सचिव मायाताई महाजन, जिल्हा संपर्क प्रमुख महेंद्र माळी, तालुका संपर्क प्रमुख समाधान माळी तसेच दिपक माळी युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊ गुलदगड तसेच प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला आघाडी यांच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.