पहूर, ता. जामनेर । तालुक्यातील पाळधी येथील एका रूग्णाचा कोरोना चाचणी अहवाल रात्री उशीरा पॉझिटीव्ह आला असून यामुळे तालुक्यातील बाधीत रूग्णांची संख्या तीन इतकी झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. या माहितीला नोडल अधिकार्यांनी दुजोरा दिला आहे.
पाळधी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीला १९ मे रोजी पहूर ग्रामिण रुग्णालय येथुन जिल्हा कोविड रुग्णालयात हलविण्यात आलेले होते. या रुग्णावर येथे तेव्हा पासुन उपचार सुरु होते. दरम्यान रात्री उशीरा या रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाला आहे. संबंधीत रुग्ण हा मुंबई येथून पाळधी येथे पाहूणा आला आहे. हा इसम मुळ नांद्रा गावचा असुन त्यांची मुलगी पाळधी येथे दिलेली आहे. जामनेर तालुक्यात आता एकुण तीन पॉझीटीव्ह रुग्ण झाल्याने तालुका वासीयांची चिंता वाढली आहे. पळासखेडा येथील बाधीत पोलीसाच्या संपर्कात आलेल्या एकूण २२ व्यक्तींच्या स्वॅब तपासणी अहवालाची सुध्दा प्रतिक्षा असून हे अहवाल नेमके काय येतात या कडे सुद्धा तालुकावासीयांचे लक्ष आता लागले आहे.
तालुक्यातील जनतेने विनाकारणाने कामा शिवाय बाहेर पडु नये. वारंवार हात स्वच्छ करावे, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा उपयोग करावा व खबरदारी घ्यावी असे आवाहन जामनेर तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान पाळधी येथील त्या पॉझीटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील ८ जणांचे तर दोंदवाडे येथील पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या मयत रुग्णाच्या संपर्कातील ६ जणांचे आज ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यात असून पहूर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये त्यांचे विलगीकरण करण्यात आले असल्याची माहीती नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे.