जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथे स्वराज्य गृपच्यावतीने पहिल्यांदा गावात भव्य शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याने प्रसिध्द हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मार्गदर्शन केले.
गावातील माळी समाज मंगल कार्यालयात बुधवार १० ऑगस्ट रोजी सकाळी भव्य मेळाव्याचे आयेाजन स्वराज्य गृपचे संस्थापक तथा माजी सरपंच कमलाकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थित शेतकरी बांधवांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मार्गदर्शन केले. यात उपस्थित शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन तसेच पिकाची लागवडीची माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यात १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट सूर्य दर्शन होणार आहे तर १६ आणि १७ तारखेला जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोणत्या वर्षी जास्त पाऊस पडेल तसेच कोणत्या वर्षी कमी पाऊस कसा पडेल, तसेच गारगोठ,तसेच विजा कशा व कशावर पडतात? याची माहिती शेतकऱ्यांना यांनी दिली व त्यापासून कसे संरक्षण करावे हे सांगितले तसेच जैन इरिगेशनचे डी.एम.बहाटे विभागीय व्यवस्थापक यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी पाळधीसह सोनाळा, भराडी, पहुर, भिलखेडा, रोटवद, सुनसगाव, माळप्रिंपी, गोडखेल, नांद्रा, सवतखेडा, मोरगावसह परिसरातील आदर्श शेती करणाऱ्या शेतकरी बांधवाचा ट्रॉफी, शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या शेतकरी संवाद मेळाव्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डख,जैन इरिगेशनचे विभागीय व्यवसथापक डी.एम.बहाटे, माजी सरपंच कमलाकर पाटील, कृषी अधिकारी जामनेर अभिमन्यू चोपडे, भाजपा तालुका अध्यक्ष चंदू बाविस्कर, सरपंच प्रशांत बाविस्कर, माजी जि.प.सदस्य अमित देशमुख, बाबुराव घोंगडे, समाधान पाटील, राजमल भागवत, दिलीप खोडपे, उपसरपंच नीता पाटील, कृषी सहाय्यक अनिल गायकवाड, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ शेतकरी बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन रोकडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच डिगांबर माळी यांनी आभार मानले.