मुंबई : वृत्तसंस्था । “उत्तर प्रदेशात १ हजार हेक्टरपेक्षा जास्त जागेवर जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभी करण्यात येईल,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज याची अधिकृत घोषणा केली. सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले,” उत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचं काम आम्ही करत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधिकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिलं. आशियातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर ही फिल्म सिटी उभी करणार आहोत. या ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही यासाठी रस दाखवला आहे. त्यासाठी त्यांचं अभिनंदन,” अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.