जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाच्या दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी निषेध आंदोलन करण्यात आले व जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जळगाव जिल्हा महिला ठेविदार कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने परवानगी दिलेल्या सहकारी पतसंस्था हे ठेवीदारांना ठेवीच्या रकमा परत देत नसल्याने लोकशाहीच्या मार्गाने ठेवीच्या रकमा परत मिळाव्यात या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. अनेक वेळा शासनाकडे निवेदने, तक्रारींद्वारे ठेवी परत मिळाव्या अशी मागणी करून देखील पतसंस्थांमधून ठेविदारांना रकमा परत मिळाल्या नाहीत. या ठेवींमध्ये महिलांच्या ठेवी रकमा अधिक प्रमाणावर आहे.
दरम्यान, महिला ठेवीदारांना पतसंस्थामधून ठेवीच्या रकमा परत मिळाव्या, यासाठी राज्य महिला आयोगाकडे अहवाल पाठवण्यात यावा, जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या तक्रारी तातडीने निकाले काढण्यात याव्यात, बढे पतसंस्थेच्या कर्ज मॅचिंगच्या पावत्यांची चौकशी करावी, चक्रधर पतसंस्थेमध्ये झालेल्या अपहर प्रकरणात कारवाई करावी व झालेला व्यवहार रद्द करण्यात यावा, फसवणूक करणाऱ्या पतसंस्था चालकांविरोधात कारवाई करण्याच्या विशेष आदेश देण्यात यावे, यासह अनेक प्रलंबित मागण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुधवार ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी यशोदा महाजन, नीलिमा कोल्हे, रंजना पाटील, वैशाली नेहते, शालिनी अत्रे, ताराबाई माळी, प्रज्ञा पाटील, शांता ढाके, नलिनी महाजन, रजनी पाटील, शालिनी फेगडे, प्रभावती पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.