जागतिक आरोग्य संघटनेचे पथक वुहानमध्ये दाखल

बीजिंग : वृत्तसंस्था । संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या कोरोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे.

जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणाऱ्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे.

कामाला सुरुवात करण्याआधी दहा शास्त्रज्ञांच्या या टीमला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. काही तज्ज्ञांच्या मते प्राण्यांमधून या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केलाय, तर काहींच्या मते हे मानवनिर्मित संकट आहे. त्यासाठी वुहानमधल्या प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जाते.

 

कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार जगभरात वेगाने फोफावला. आधीच या व्हायरसचे मूळ शोधण्याला बराच विलंब झाला आहे.

 

जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीनमध्ये दाखल झालेली असताना, तिथे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. उत्तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. चीनने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते. पण तिथे पुन्हा रुग्ण संख्या वाढतेय. एका प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Protected Content