नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय. भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही देण्यात आलाय.
‘कॅनडानं नेहमीच शांततामय मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिलाय. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली’ असं ट्विट ट्रुडो यांनी केलं होतं.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्रुडो यांच्या टिप्पणीवर मीडियानं केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. ‘ आम्ही भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची टिप्पणी पाहिली, परंतु ही प्रतिक्रिया चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. या पद्धतीच्या टिप्पण्या अनावश्यक आणि निरुपयोगी आहेत. विशेषकरून जेव्हा ही बाब एका लोकशाही देशातील अंतर्गत मुद्द्यासंबंधीत असेल. अशा गोष्टी राजकीय हेतूनं चुकीच्या पद्धतीनं समोर आणू नये, हीच योग्य गोष्ट ठरेल’ असं प्रत्यूत्तर श्रीवास्तव यांनी दिलं.
दुसरीकडे, भाजपचे वजनदार नेते राम माधव यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. भारताच्या अंतर्गत मुद्यावर टिप्पणीच्या अधिकारासंबंधी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘ट्रुडो कोण आहेत? हे भारताच्या सार्वभौम मुद्यांत हस्तक्षेप करण्यासारखं नाही का?’ असं ट्विट राम माधव यांनी केलंय.
दुसरीकडे, शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ट्रुडो यांनी भारताच्या अंतर्गत मुद्यावर आपली राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न करू नये, असं चतुर्वेदी यांनी म्हटलंय. ‘प्रिय जस्टिन ट्रुडो, तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीमुळे प्रभावित आहे. परंतु भारताच्या अंतर्गत मुद्दे इतर कोणत्याही दुसऱ्या देशासाठी राजकीय चारा बनू शकत नाहीत. कृपया इतर देशांप्रती शिष्टाचाराच्या आमच्या भावनेचा सन्मान करा’ असं चतुर्वेदी यांनी ट्रुडो यांना टॅग करत म्हटलंय.