जळगाव (प्रतिनिधी) सिमी संघटनेच्या माध्यमातून देशविरोधी कारवाई आणि जळगाव शहरात बॉम्ब बनवून नागपूरमध्ये ठेवल्याप्रकरणी पुरवणी खटल्यात जळगाव न्यायालयाने दोषी ठरवलेल्या आसिफ खान बशिर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान या दोघांची मुंबई न्यायालयाच्या खंडपीठाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे.
‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. या खटल्याचा औरंगाबाद हायकोर्टात निकाल लागून साधारण पाच-सहा दिवस उलटल्या नंतरही याबाबत कुठेही बातमी प्रकाशित झालेली नाही. फक्त ‘मुंबई मिरर’मध्ये या बाबतचे वृत्त दोन दिवसापूर्वी प्रकाशित केलेले आहे. जळगावमधील सिमी (स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया)च्या पुरवणी खटल्यात न्यायालयाने आसिफ खान बशिर खान व परवेज खान रियाजोद्दीन खान या दोघांना दोषी ठरविले होते. शिक्षा सुनावताना दोघांना भादंवि कलम १२० (ब) कलमान्वये प्रत्येकी दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला होत. न्या. ए. के. पटनी यांनी आरोपींना १ एप्रिल २०१७ रोजी शिक्षा सुनावली होती. दरम्यान, भादंवि कलम १२१, १२१(अ), १२२, १२३, १५३(अ) या कलमांतून दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. न्या. पटनी यांनी सिमी खटल्याचा निकाल देताना आसिफ खान व परवेज खान यांना ३१ मार्च २०१७ रोजी दोषी धरले होते.
औरंगाबाद हायकोर्टाचे न्यायधीश आर.जी.अवचट यांनी मात्र, जळगाव कोर्टाचा निकाल रद्द ठरवला आहे. न्यायमूर्ती अवचट यांनी निरक्षण नोंदवले की, जळगावमध्ये दोघांवर जो खटला चालला, त्यात दोघांना१० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतू हा निकाल फक्त कोर्टात सादर झालेले साक्षीदारांचे आधीचे जबाब आणि पुराव्यांवर आधारित होता व त्यात कोणतेही कारण दिले नव्हते. न्या.अवचट यांनी हे पण निरक्षण नोंदवले की,सादर पुराव्यांनुसार असे सिद्ध होत नाही की, या दोघांनी अन्य दोषींसोबत मिळून भारताविरुद्ध कुठलाही कट रचला होता. दरम्यान, मुंबईतील २००६ मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोक्का कोर्टाने १२ दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये जळगावच्या आसिफ खान बशीर खानचा समावेश होता. आसिफ सध्या येरवडा कारागृहात आहे.