जळगाव प्रतिनिधी । कारागृह कर्मचारी निवासस्थानावर चढुन सबजेलमध्ये बंदी असलेल्या कैद्यासाठी विडी बंडलसह कपडे, साबण असलेली पिशवी आत फेकण्याच्या प्रयत्ना असलेल्या एका तरुणास पोलिसांनी पाठलाग करुन आज दुपारी पकडले. दोन दिवसांपुर्वी कारागृहरक्षकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेऊन तीन कैद्यांनी पलायन केल्याच्या प्रकरणास तीन दिवस होत नाहीत तोपर्यंत हा आणखी एक गंभीर प्रकार आज घडला.
याबाबत माहिती अशी की, सोनुसिंग रमेश राठोड (वय २०, रा.सुप्रिम कॉलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. राठोड हा मंगळवारी दुपारी प्रतिबंधीत क्षेत्र असलेल्या कारागृह कर्मचाऱ्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या छतावर चढला होता. त्याच्या हातातील एका पिशवीत विडी बंडल, कपडे, साबण, टोस्टचे पाकीट असे साहित्य होते. कारागृहातील कैद्याला भिंतीवरुन तो साहित्य फेकुन देणार होता. यासाठी तो कैद्याला आवाज देत होता. तत्पूर्वी राठोड याचा आवाज ऐकुन कारागृह रक्षक अमीतकुमार पाडवी हा बाहेर आला. पाडवी यांना पाहुन राठोडने छतावरुन उडी मारुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यात राठोडच्या हात-पायांना खरचटले. दरम्यान पाडवी यांनी सहकारी असलेले कुलदीपक दराडे, विक्रम हिवरकर व कारागृह अधिकारी किरण पवार यांना आवाज देऊन घटना सांगीतली. जेलच्या कर्मचाऱ्यांनी संशयिताचा पाठलाग करून कारागृहाबाहेर असलेल्या चहाच्या टपरीजवळ ताब्यात घेतले. पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित राठोड याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.