जळगाव प्रतिनिधी । जळगावचा राज्यातील रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यात आला असल्याने जिल्हयास लॉकडाऊनमधून शिथीलता मिळण्याची शक्यता मावळल्याचे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेशी साधलेल्या संवादातून रेड झोनमधील जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथील होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. यानंतर प्रशासनाने राज्यातील झोन जाहीर केले असून यात जळगावचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आपल्या जिल्ह्यास लॉकडाऊनमधून शिथीलता मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे व जळगावचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. कोरोना प्रकोपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात कमी प्रमाणात रूग्ण आढळून आले होते. नंतर मात्र हा आकडा वाढत असून यात दररोज भर पडतच आहे. विशेष करून अमळनेरात याचा भयंकर प्रादूर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. याच्या खालोखाल भुसावळ व जळगावात रूग्ण आढळले आहेत. यातच आता आपल्या जिल्ह्याचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून जास्त वेळ लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.