पाचोरा प्रतिनिधी । कुणी कितीही टेंभा मिरवला तरी जिल्ह्यात शिवसेनाच ‘नंबर वन’ असल्याचा जोरदार टोला आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला. ते आमदार किशोर पाटील यांच्या नव्या संपर्क कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आपल्या निवासस्थानाच्या जवळ शिवालय हे अद्ययावत संपर्क कार्यालय उभारले आहे. याचे लोकार्पण आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, आमदार किशोर पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सीमेवर हुतात्मा झालेले जवान आणि भाजपचे दिवंगत जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, कुणी कितीही टेंभा मिरवला तरी आता जिल्ह्यात शिवसेना नंबर वन असून पुढील निवडणुकांमध्ये आम्हीच यश मिळवणार आहोत. तर, कोविड विरूध्दचे युध्द आपण जिंकणारच असल्याचा आशावाद देखील ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.