जळगाव प्रतिनिधी । ‘करोना’ या विषाणुजन्य आजाराने थैमान घातल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मध्येच अवकाळी पावसाची हजेरी यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी शेतातील धान्य वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे गहु काढण्यासाठी पंजाब येथून काही मशिनरी जिल्ह्यात दाखल झाले आहे.
सध्या सगळीकडे गहू काढणीचे कामे सुरू आहेत. कोरोनाचे संकट असतानाही शेतकरी राजा शेतातील गहू व हरबरा पीक काढणीच्या कामात व्यस्त दिसून येतोय. पंजाब येथून सालाबादप्रमाणे गहू काढण्याचे मशिन आल्यामुळे शेतकरी या पंजाबच्या हॉरोमशिनने गहू काढत आहेत. एक बिघेकरीता १५०० रुपये असा भाव आहे. मजूर एका बिघेकरीता २५०० रुपये, कटाई व थ्रेशरच्या एका पोत्यास २०० रुपये आणि काढण्याची मजुरी दिडचौथे असे एकूण ६ ते ७ हजार रुपये खर्च येतो , त्यामुळे शेतकरी पंजाबच्या हॉरोमशिनने गहू काढणे पसंत करीत आहेत. एक बिघा गहू काढणीसाठी या मशिनद्वारे अवघ्या पंधरा मिनिटाचा कालावधी लागतो शिवाय वेळ कमी लागत असल्याने शेतकऱ्यांना सोपे झाले आहे. जिकडे तिकडे गहू आणि हरभरा काढणीचे कामे वेगाने सुरू असल्याचे दृश्य दिसत आहे.