जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होऊ नये म्हणून जिल्ह्यातील मद्यविक्रीवरील बंदी 30 एप्रिल अखेर पूर्ण दिवस कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. जळगाव शहरात कोरोना (कोव्हीड-19) विषाणुचा प्रादुर्भाव होण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील सीएल-2, सीएल-3, सीएल/एफएल/टीओडी-3, एफएल-1, एफलएल-2, एफएलबीआर-2, टीडी-1, इत्यादी देशी/ विदेशी मद्य/बीअर/ताडी विक्री अनुज्ञप्त्या 14 एप्रिल, 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते. आता शासनाने 30 एप्रिल, 2020 पर्यंत संपुर्ण राज्यात बंदी (Lockdown) लागु करण्यात आली आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता व त्यात वाढ होऊ नये म्हणून जिल्ह्यातील मद्यविक्रीवरील बंदी 30 एप्रिल अखेर पूर्ण दिवस कायम ठेवण्यात आलेली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. या आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात येईल. असेही डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.