आता जनधन योजनेचे पैसे पोस्टातूनही काढता येणार

जळगाव, प्रतिनिधी । प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत जनधन योजनेच्या प्रत्येक खात्यात ५०० रुपये जमा करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या घोषणेमुळे सर्व जनधनचे खातेदार बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. त्या दृष्टीकोनातून जनधन योजनेचे पैसे आता पोस्टातून काढता येणार असल्याची माहिती भारतीय मोस्ट पेमेंट बँकेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक मनिष तायडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येक शासकीय कार्यालयात किमान उपस्थिती ५ टक्केच असावी असा शासकीय आदेश असल्याने आणि देश व राज्यामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पुरेपुर पालन होण्यासाठी लॉकडाऊन सुरू असून अशाप्रकारे बँकांमध्ये गर्दी झाल्यास सामाजिक सुरक्षेला ते बाधक ठरू शकते. कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव हा मुख्यत्वे सुरक्षित अंतर न ठेवल्याने संसर्गीकरित्या होत असतो असे जागतिक आरोग्य संघटनेने वारंवार सांगितले आहे. तेव्हा अशाप्रकारे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासनस्तरावरून आयोजिलेल्या विविध उपायातंर्गत पोस्टाने जनधनच्या खातेदारांसाठी जिल्ह्यातील 535 पोस्ट कार्यालयात जनधनचे पैसे देणे, खात्यावर जमा झाल्याची खातरजमा करणेचे काम सुरू आहे. शहरी भागांमधील पोस्टांमध्ये त्यासाठी विशेष काऊँटर उघडले असून ग्रामीण भागात आहे त्या कर्मचारी वर्गाकडून त्यांच्या नियमित कामाबरोबरच हे काम केले जात आहे.

तरी जनधनच्या सर्व खातेदारांनी बँकेत गर्दी न करता आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयात आपले आधारकार्ड सोबत घेवून जावून आपल्या बोटाचा ठसा मॅच करून देवून सहजरित्या पैसे काढावेत किंवा जमा झाल्याची खात्री करावी. आणि बँकांमधील गर्दी कमी करण्यास सहकार्य करावे. असे आवाहन, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, भारतीय पोस्ट पेमेंट बँक, जळगाव मनिष तायडे यांनी जिल्ह्यातील सर्व जनधन खातेदारांना पत्रकाद्वारे केले आहे.

Protected Content