जळगाव जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 208 कोटींचा पीक विम्याचा लाभ : ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) खरीप हंगाम सन 2019-20 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 1 लाख 45 शेतकऱ्यांना 208 कोटी 34 लाख 13 हजार 640 रुपयांचा प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ मंजूर झाला आहे. अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक जितेंद्र देशमुख, धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद ननावरे आदि उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ना. पाटील पुढे म्हणाले की, मागील खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विविध अडचणींना सामारे जावे लागले होते. मात्र राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू माणून त्यांच्या पाठिशी ठाम उभे राहिले. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 1 हजार 403 शेतकऱ्यांनी 1 लाख 12 हजार 126 हेक्टर क्षेत्राचा 393 कोटी 71 लाख 38 हजार 519 रुपयांचा पीक विमा काढला होता व त्यापोटी 18 कोटी 88 लाख 31 हजार 182 रुपयांचा शेतकरी हिस्सा भरला होता. तर उर्वरित हिस्सा शासनाने भरला होता. पीक विमा कंपनीच्या नियमानुसार कापूस पिकासाठी जिल्ह्यातील 86 मंडळ तर तूर पिकासाठी 66 मंडळ पीक विम्यासाठी पात्र ठरले होते. त्यानुसार जिल्ह्यातील 1 लाख 45 शेतकऱ्यांना 208 कोटी 34 लाख 13 हजार 640 रुपयांचा प्रधानमंत्री पीक विम्याचा लाभ मंजूर झाला असून सदरची रक्कम विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यात खतांची टंचाई नाही. तथापि, मालधक्क्यावरील काही हमाल कोरोना बाधित आढळल्याने आलेले रॅक उतरविण्यात अडचण येत होती. परंतु आता पाचोरा येथे खते उतरवून पोहोच करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. जिल्ह्यातील कापूस व मका खरेदीबाबत बोलतांना ते म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत 90 लाख क्विंटल कापसाची तर 9 लाख क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे. केळी पिकाच्या विम्याचे निकष केंद्र शासनाने बदलले असून ते पूर्ववत करण्याची मागणी राज्य शासन केंद्राला करणार त्याचबरोबर 113 बटालियने प्रशिक्षण केंद्र हे जिल्ह्यातच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 600 कोटी रुपये, केळी फळपीक विम्याचे 275 कोटी रुपये तर आता पिक विम्याचे 208 कोटी असे एकूण 1083 कोटी रुपयांची मदत शासनाने दिली आहे.   नैसिर्गिक आपत्तीमुळे भविष्‌यात होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पिक विमा काढण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

 

तालुकानिहाय पिक विमा मिळालेल्या शेतकरी संख्या (कंसात रक्कम)

 

अमळनेर – 28382 (57 कोटी 25 हजार 745),
भडगाव – 3004 (2 कोटी 16 लाख 62 हजार 69)
भुसावळ – 492 ( 2 कोटी 22 लाख 70 हजार 424),
बोदवड – 1869 (4 कोटी 72 लाख 57 हजार 127)
चाळीसगाव – 6253 (9 कोटी 23 लाख  76 हजार 652),
चोपडा – 8176 (22 कोटी 45लाख 49 हजार 689)
धरणगाव – 6322 (13 कोटी 95 लाख 12 हजार 20)
एरंडोल – 3397 (6 कोटी 98 लाख 64 हजार 35 )
जळगाव – 2121 (5 कोटी 29 लाख 63 हजार 107)
जामनेर – 18101 (42 कोटी 35 लाख 96 हजार 697 )
मुक्ताईनगर -2006 (3 कोटी 80 लाख 69 हजार 651)
पाचोरा -4032 (10 कोटी 96 लाख 35 हजार 557)
पारोळा -12962 (25 कोटी 11 लाख 20 हजार 679 )
रावेर -1076 (1 कोटी 19 लाख 36 हजार 269)
यावल -1852 (1 कोअी 85 लाख 73 हजार 912)

Protected Content