अमळनेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आज जळगाव जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात अगोदर जून व जुलै महिन्यात पर्जन्यमान 50 टक्के पेक्षा कमी होते तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग, कांदा, सोयाबीन, मका, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उडीद व मूळ यांना कोंब आले आहे. कापसाचे बोंड जास्त पाण्यामुळे लाल झाले असून बोंड खाली गळून गेले आहेत. सोयाबीन मका आणि पीक देखील अतिवृष्टीमुळे पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जळगाव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जळगाव जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनावर जळगाव जिल्हा प्रभारी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, जिल्हा किसान जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, अमळनेर तालुका अध्यक्ष प्रा.सुभाष पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, धरणगाव किसान काँग्रेस कमिटीचे गोकुळ पाटील, किसान सेना सदस्य निळकंठ पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.