जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहरात महानगरपालिकेने तात्काळ विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिले आहेत.
जळगाव शहरात विद्युत दाहिनी नसल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येत आहे. त्यातच कोरोना बाधित रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईक तयार होत नाही. यामुळे प्रशासनास अडचणीना सामोरे जावे लागले होते. ही बाबही आरोग्यमंत्री यांच्या निदर्शनास आल्याने या पार्श्वभूमीवर विद्युत दाहिनी कार्यान्वित करावी, अशी मागणी होती. त्यामुळे मंत्री श्री. टोपे यांनी वरील आदेश दिले.
त्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने जिल्हा नियोजन समितीस प्रस्ताव सादर करावा. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असेही मंत्री श्री. टोपे यांनी निर्देश दिले. महापालिका आयुक्ताकडून याबाबतचा प्रस्ताव प्राप्त होताच त्यास विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात येऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.