जळगाव प्रतिनिधी । आज सकाळी रेल्वे स्थानकाजवळ तरूणावर झालेल्या हल्ल्यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज पुन्हा दुपारी दोघांवर हल्ला करण्यात आला असून जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, आज सकाळी चेतन संजय करोसिया या तरूणावर एका टोळक्याने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली होती. हा प्रकार रेल्वे स्थानकाजवळ घडला होता. काल वाघनगर परिसरात एका लग्नात झालेल्या वादाची याला किनार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. दरम्यान, यानंतर दुपारी साडेतीन वाजता काव्य रत्नावली चौकाच्या परिसरात नेहाल संजय शिंदे (वय २०, रा. समता नगर) आणि विशाल अनिल घेंगट (वय २१ ) या दोन तरूणांवर हल्ला करण्यात आला. यात हे दोन्ही जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात जखमी झालेले तरूण हे सकाळी जखमी झालेल्या चेतन करोसिया याचेच मित्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असल्याने आधीच्या प्रकरणाशीच याचा संबंध असल्याचे दिसून येत आहे.