जळगाव प्रतिनिधी । शहरात लॉकडाऊन असतांना बेकायदेशीर तंबाखू, सुगंधी पानमसाला व गुटखाची विक्रीसाठी साठवणूक करणाऱ्या एमआयडीसीतील एका कंपनीवर छापा टाकून सुमारे साडे तेरा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुटखा पान मसाल्याची साठवणूक व विक्री करण्यास मनाई आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील जी सेक्टरमध्ये बेकायदेशीर व विनापरवाना गुटखा, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थाची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज कारवाई करत १० लाख २३ हजार ३६० रूपये किंमतीचा पान मसाला, २ लाख ४३ हजार ३६० रूपये किंमतीचा तंबाखू आणि १ लाख १ हजार ४०० रूपये किंमतीचे गुटखा असा एकुण १३ लाख ६८ हजार १२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
स.पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सिध्देश्वर आखेगावकर, स.फौ. चंद्रकांत पाटील, रविंद्र घुगे, पोना. महेश महाजन, किरण चौधरी, चापोकॉ दर्शन ढाकणे, स.फौ.विनयकुमार देसले, पोकॉ अशोक फुसे, सुनिल चौधरी, प्रविण पाटील, जमील खान, पोकॉ रविंद्र पाटील, पोकॉ भुषण मांडोळे, पोकॉ असिफ पिंजारी, भरत डोळे यांनी छापा टाकून कारवाई केली.