जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा परिषद, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 एप्रिल, 2023 या कालावधीत जी. एस. ग्राऊंड, जळगाव येथे अन्नधान्य, फळे, भाजीपाला महोत्सव व शासकीय योजनांच्या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या धान्य महोत्सवामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल शेतकरी ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेतून ग्राहकांना योग्य दरात उपलब्ध होणार आहे. वर्षभरासाठी आवश्यक धान्य जसे गहू, ज्वारी, बाजरी, तांदुळ, कडधान्ये, डाळी व इतर उत्पादने खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच कृषि यांत्रिकीकरण ट्रॅक्टर, रोटाव्हेटर इ. औजारे गुलाब, निशिगंध, झेंडु, कांदाचाळ, पॅक हाऊस, ठिबक, तुषार, ज्वारी, बाजारी प्रात्यक्षिके, वैयक्तिक शेततळे, फळबाग लागवड, पीएमएफएमई, पोक्रा इ. योजनांचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत 7/12 खाते उतारा, आधार कार्ड व बँक पासबुकाची छायांकीत प्रत आणावी.
तरी जिल्ह्यातील शेतकरी बंधु, नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन महोत्सवास भेट देऊन शेतकरी बंधुना/गटांना प्रोत्साहित करावे. असे आवाहन संभाजी ठाकूर, प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.