जळगावात डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले

dampar accident

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वाळूच्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास खोटे नगर स्टॉपजवळ घडली. रस्त्याने आज पुन्हा एकाचा बळी घेतला. अजून किती जणांचा बळी या रस्त्यामुळे जाणार असल्याचा संताप नागरीकांकडून व्यक्त होत होता. डंपर चालक फरार झाला असून डंपर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, अनिल वसंत पाटील (वय-५७) रा. चितोडा ता.यावल ह.मु. नारायण नगर, बिबा नगर हे एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होते. कंपनीतून दुचाकी (एमएच १९ एएन २६९७)ने घरी जात होते. खोटे नगर स्टॉपजवळून घराकडे जात असतांना जळगावकडून बांभोरीकडे जाणाऱ्या वाळूच्या डंपर (एमएच १९ झेड ५७५६) ने धडक दिली. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडल्याने मागुन येणाऱ्या त्याच डंपरच्या चाकाखाली डोके आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर नागरीकांनी एकच गर्दी केली होती. त्याच्याच गल्लीत राहणारे योगेश बाविस्कर आणि गौतम गवई या तरूणांनी मयत अनिल पाटील यांना ओळखले. त्यांनी तातडीने नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मृतदेह जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले.

मयताच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा अजय आणि मुलगी जयश्री असा परीवार आहे. ज्योती पाटील ह्या मु.जे. महाविद्यालयाजवळ असलेल्या ओरीयन्ट इंग्लीश मिडीयम स्कूलला शिक्षिका आहेत तर दोन्ही मुले हे एसएसबीटी इंजिनिअरींग कॉलेजला शिकत आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Protected Content