जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुने बी.जे. मार्केट जवळ असलेल्या गुजराथी गल्लीतील एका घरातून अज्ञात चोरट्याने २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी उघडकीला आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, मिना दिशेन मल्लारा (वय-५८) रा. गुजराथी गल्ली, जुने बी.जे. मार्केट हे आपल्या मुलगा व सुन यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. मुलगाचा व्यवसाय असल्यामुळे ते कामासाठी ११ मार्च रोजी सकाळीच निघुन गेले होते. तर सकाळी १० वाजता मिना मल्लारा आणि त्यांची सुन हे दोघे कामाच्या निमित्ताने बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी घरात तीन मोलकरीण आणि नात घरात होते. दुपारी काम आटोपून सुनेसह मिना मल्लारा घरी परतल्या. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांनी घरातील कपाट उघडले असता त्यांना कपाटात ठेवलेले २ लाख ७० हजार रूपयांची रोकड दिसून आली नाही. त्यांनी मुलगा आणि सुन यांना विचारणा केली असता त्यांनी आपण घेतले नसल्याचे सांगितले. जिल्हा पेठ पोलीसात धाव घेवून हकीकत सांगितली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. याप्रकरणी मिना मल्लारा यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदिप पाटील करीत आहे.