जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जेसीआय जळगाव सेंट्रल संस्थेतर्फे “कपल ट्रेनिंग” कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमामध्ये वैवाहिक आयुष्यातील विविध पैलूंवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी माहिती देऊन प्रबोधनासह कार्यक्रमात रंगतही आणली.
जेसीआय जळगाव सेंट्रलतर्फे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्यानुसार नुकताच “कपल ट्रेनिंग”कार्यक्रम घेण्यात आला. त्यात ‘मेड फॉर इच अदर’ संकल्पनेअंतर्गत जोडप्यांना वैवाहिक आयुष्यातील विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मार्गदर्शक म्हणून अमरावती येथील अँड. महेंद्र चांडक आणि संतोष बेहरे यांनी जेसीआयच्या पदाधिकारी व सदस्यांना विविध विषय घेऊन त्यानुसार मार्गदर्शन केले.
वैवाहिक आयुष्यातील ताण-तणाव कसे हाताळावे, त्याचबरोबर आयुष्यात येणारे विविध प्रसंगांना कशा पद्धतीने सामोरे जावे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असताना पती-पत्नींनी सामंजस्य, सौहार्द, तडजोड आणि प्रेम कशा प्रकारे टिकवून ठेवावे याविषयी मार्गदर्शकांनी उपस्थित जोडप्यांना माहिती दिली. नकारात्मक प्रसंग प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात येतात, मात्र त्यातून सकारात्मकता कशी निर्माण करावी याबाबतही त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित जोडप्यांनी देखील त्यांचे विविध अनुभव सांगून कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमासाठी प्रकल्प समन्वयक प्रसाद झंवर, वेणूगोपाल बिर्ला, संस्थेचे अध्यक्ष वेणुगोपाल झंवर, सचिव तुषार बियाणी, ऋषभ शहा यांच्यासह समर्थ खटोड, नीरज दहाड, अक्षय गादिया, विकल्प बोथरा, पंकज भावसार, हेमंत आगीवाल, अंकुष जैन, सागर नवाल, अर्पित बोथरा, गौरव कोगटा, चेतन शेठ, कल्पक सांखला आदींनी सहभाग घेतला.