जळगाव प्रतिनिधी । वीजेच्या तारांवरील झाडाची फांदी काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा वीजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, शेख कादर शेख अमीर (वय-३५) रा. नशिराबाद ह.मु. तांबापूरा हे कंत्राटी वायरमनचे काम करतात. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीजवळील सिध्दीविनायक हॉस्पिटलच्या मागे असलेल्या ११ केव्हीए डीपीवरील असलेले झाडाची फांदी तोडण्यासाठी झाडावर चढले. त्यावेळी ११ केव्हीए डीपी बंद होती. त्याच डीपीच्या ११ फुट अंतरावर ३३ केव्हीए वीज क्षमतेची डीपी आहे. दरम्यान झाड तोडत असतांना झाडाची फांदी ३३ केव्हीए वर पडता विजेचा जोरदार धक्का शेख कादर यांना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जिल्हा कोवीड रूग्णालयात मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आईवडील असा परिवार आहे.