जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पिंप्राळा हुडकोत राहणाऱ्या एका चार वर्षीय चिमुकलीचा मृतदेह आज दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयास्पद परीस्थितीत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे मयत चिमुकली सकाळी ९ वाजेपासून बेपत्ता होती.
या संदर्भात अधिक असे की, अरशिन शाबीर शहा ( वय ४ रा. पिंप्राळा हुडको, घर क्र.५९) ही आज सकाळी साधारण ९ वाजेपासून घरातून अचानक बेपत्ता झाली होती. तिचे आई-वडील सर्वत्र तिचा शोध घेत होते. अगदी परिसरातील मशीदतून असशिना बेपत्ता असल्याचा बाबत पुकारा करण्यात आला होता. परंतू दुपारी साधारण २ वाजेच्या सुमारास ६२ नंबर राहणारे शेख मुश्ताक यांची मुलगी सुहाना (वय.१२) ही कपडे वाळवण्यासाठी घराच्या बाजूला असलेल्या शेवटच्या चौथ्या मजल्यावर जात असतांना तिला अरशिना निपचित स्थितीत आढळून आली. तिने तत्काळ अरशिनाला उचलून तिच्या घरी नेले. परंतू घरी आई रिजवानाबी शाहा नव्हती. त्यामुळे सुहानाने अरशिनाला शेजारी राहणाऱ्या जनाबाई निवृत्ती भोई यांच्या घरी नेले. पण जनाबाई यांनी मुलीला जिथून उचलून आणले तिथेच नेऊन ठेव आणि तिच्या आई-वडिलांना बोलवायला सांगितले. थोड्याच वेळात ही घटना सर्वत्र पसरली. त्यानंतर अरशिनाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत असल्याचे घोषित केले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.