जळगावातून कटलरी व्यवसायिकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातून कटलरी व्यवसायिकाची १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत शुक्रवारी २९ जुलै रोजी रात्री उशिरा शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीलाल त्रंबक सोमाणी (वय-६३) रा. पाळधी ता. धरणगाव ह. मु. शनीपेठ, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव शहरात बॉम्बे लॉटस, प्लास्टिक कटलरीचे दुकान असून दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे ते बुधवारी २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे शनिपेठ भागात असलेल्या दुकानावर दुचाकी (एमएच १९ टी ९१४) ने आले. दुकानाच्या बाजूला मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची १० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शुक्रवारी २९ जुलै रोजी रात्री ११ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परिस जाधव करीत आहे.

Protected Content