जळगावातील रस्त्यांची दुर्दशा व चेक पोस्टचा झोल : आ. खडसेंनी उपस्थित केला प्रश्‍न

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील रस्त्यांची दुर्दशा तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथील गैरव्यवहार प्रकरणात नेमकी काय कारवाई करण्यात आली ? याबाबत आज आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित केला.

विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य आ एकनाथराव खडसे यांनी जळगाव महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची झालेल्या दुरावस्थे विषयी आणि मुक्ताईनगर मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या चेक पोस्ट नाक्यावर होत असलेल्या गैरव्यवहारा विषयी तारांकित प्रश्न उपस्थित केले त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी उत्तरे दिली.

जळगाव महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे विषयी एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये त्यांनी रस्त्यांसाठी गेल्या तीन वर्षात किती निधीमंजूर करण्यात आला व किती खर्च करण्यात आला तसेच जळगाव शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच खराब रस्त्यांमुळे जळगावात अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देताना सांगितले जळगाव महानगरपालिका क्षेत्रात अमृत योजना व भुयारी गटार योजने अंतर्गत कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदण्यात आले असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे या रस्त्यांच्या पुनर्बांधणी साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान अंतर्गत महानगरपालिकेच्या १०० कोटींच्या प्रस्तावास १६ /८/२०१८ अन्वये तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी २२/३/२०२२अन्वये शहरातील ४९ रस्त्यांच्या पुनर्बांधणी करिता ३९ कोटी रकमेस मान्यता देण्यात आली असून ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत यापैकी शासनाकडून ८.९३ कोटी व महानगरपालिका हिश्यातील ५.१०कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग करण्यात आले आहेत. ज्या रस्त्यावरील पाणीपुरवठा व मल्लनिसरण योजने अंतर्गत ची कामे पूर्ण झाली आहेत त्या रस्त्यांची पुनर्बांधणी ची कामे सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत सुरू करण्यात आली आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांनी पुरनाड चेक नाक्यावरील गैरव्यवहाराचा प्रश्‍न देखील उपस्थित केला. महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर परिवहन विभागाच्या अधिकारी ट्रक चालकांकडून लाच स्वीकारतात तसेच वजन मापात फेरफार करून ट्रक चालकांकडून अवैध मार्गाने पैसे गोळा करतात. या अधिकार्‍यांवर काय कारवाई करण्यात आली याबाबत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला.

त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले त्यात ते म्हणाले सीमा तपासणी नाका पुरनाड ता मुक्ताईनगर येथे नेमलेल्या खाजगी कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्या बाबत तसेच सीमा तपासणी नाका पुरनाड येथे कार्यरत असणार्‍या वजन काट्यांचे कॅलिब्रेशन करून घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी उचित कार्यवाही करण्या बाबत उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच सीमा तपासणी नाक्यावरील वजन काट्यांची तपासणी आठवड्यात एकदा करण्यात यावी याबाबत संबंधित क्षेत्रीय कार्यालयाना कळविण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Protected Content