जळगावातील प्रिटींग दुकानाला आग; लाखोंचे नुकसान, नोंद घेण्यास पोलीसांकडून टाळाटाळ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बी.जे.मार्केटमधील दुकानाला भीषण आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलीसांनी घटनेची माहिती देवून घटनास्थळी ढुंकूनही पाहिले नसल्याचा प्रकार दिसून आला. पोलीसांच्या अनागोंदी कारभारामुळे नागरीकांनी नाराजी व्यक्त केली. घटनेला १५ तास उलटून देखील अद्याप कोणतीही नोंद दाखल करण्यात आलेला नाही.

याबाबत माहिती अशी की, दिपक शालीक मराठे (वय-३९) रा. बदाम गल्ली, जुने जळगाव यांचे नविन भिकमचंद जैन मार्केटमध्ये साई प्रिंटर्स नावाचे प्रिंटींगचे दुकान आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याभरापासून मार्केटमधील सर्व दुकाने बंद आहे. गुरूवारी रात्री १० वाजता अचानक दुकानाला आग लागली होती. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करत होते. या आगीचा धुर मार्केटमध्ये वर राहणाऱ्या रहिवासी पंकज पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी खाली येवून बघितले तर दुकानाला आग लागलेली दिसून आली. स्थानिक रहिवाश्यांनी महानगर पालिकेचा बंबाला बोलवून रात्री १२ वाजेच्या सुमारास आग विझविली. दरम्यान पंकज पाटील यांनी दुकान मालक दिपक मराठे यांना घेण्यासाठी रात्री राहत्या घरी गेले व घडलेला प्रकार सांगितला.

४ लाखांचे नुकसान
दिपक मराठे दुकानात येईपर्यंत दुकानातील ३ कॉम्प्यूटर, ३ प्रिंटर, १ रेडीयम फ्लोएट, सोनी कंपनीचे दोन व्हिडीओ कॅमेरे, १ जींबल, १ फ्रिज, ए.सी., टीशर्ट प्रिंटींग मशीन, इन्व्हर्टर बॅटरी, साऊंड सिस्टीम, फर्निचर, प्रिंटींग कलर, रेडीअम मटेरीअल, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व डीव्हीआर, महत्वाचे कागदपत्रे, मोबाईल असा अंदाजे ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले आहे.

घटनेची नोंद घेण्यास पोलीसांकडून टाळाटाळ
रात्री उशीरापर्यंत आग लागल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरीकांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संपर्क करून घटनेची माहिती दिली. मात्र पोलीसांनी घटनास्थळी येवून कोणताही पंचनामा केला नाही किंवा गुन्हा दाखल केला नाही. घटनेला १२ तासहून अधिक कालावधी संपला मात्र याबाबत पंचानामा किंवा पाहणी केली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. दुकानदार दिपक मराठे यांनी आज सकाळी घटनेची नोंद व माहिती देण्यासाठी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना विज पुरवठा बंद असल्याचे कारण सांगून दोन वेळा त्यांना घरी पाठविण्यात आले.

Protected Content