जळगावच्या तहसीलदार हिंगे सक्तीच्या रजेवर; प्रभारी तहसीलदारपदी श्‍वेता संचेती

जळगाव प्रतिनिधी । शासकीय कामकाजात दिरंगाई, शेतकऱ्यांना अनुदान वाटप न करणे, चक्रीवादळाची मदत न मिळणे, धान्याचे योग्यरीतीने वाटप न करणे या कारणावरून तहसीलदार वैशाली हिंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी रात्री उशिरा काढले आहे. दरम्यान जळगाव प्रभारी तहसीलदारपदी संजय गांधी योजनेच्या तहसीलदार श्‍वेता संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तहसीलदार हिंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच झाला होता. मात्र लेखी आदेश काढण्यात तब्बल आठवडा गेला. शासकीय कामकाजात दिरंगाई, राज्यस्तरावरून मागविलेली माहिती योग्य वेळेत न पाठविणे, शेतकऱ्यांना अनुदान व चक्रीवादळाची मदत न मिळणे, धान्याचे योग्यरीतीने वाटप न करणे आदी कारणे सक्तीच्या रजेवर पाठविण्याची आहेत.

ही आहे सक्तीच्या रजेची कारणे
* शेतकऱ्यांना २०१८ मध्ये खरीप अनुदान देण्यासाठी ३० कोटी ७९ लाखांचा निधी जिल्ह्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची माहिती योग्य पद्धतीने एकत्रित न करता, अनुदान वाटप झाले. त्यात अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. ७ कोटी ८० लाखांचे अनुदान शासनाकडे परत गेले आहे.
* विधानसभा निवडणुकीतही खर्चाची बिले वेळेत सादर केली नव्हती. परिणामी 25 लाखांचा निधी परत गेला. पुरवठा दारांची बिले देता आली नाही.
* २०१९ मध्ये चक्रीवादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे, अकाउंट नंबर, खाते क्रमांक आदी माहिती शहानिशा न करता जिल्हा बॅंकेला देण्यात आली. चुकीच्या माहितीमुळे अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या आहेत.

* जळगाव तालुक्‍याची महसूल वसुली यंदा केवळ ७९ टक्के झाली. वसुलीकडेही हिंगे यांनी लक्ष दिलेले नाही. यामुळे महसूल वसुलीवर परिणाम झालेला आहे.
* अनेक उमेदवारांना जातीचे दाखल्यांचे वाटप शहानिशा करता केलेले आहे. यामुळे तलाठी भरतीत अनेकांना वंचित राहावे लागले. धान्य पुरवठ्याच्या कामातही दिरंगाई केली आहे. यासह विविध कारणे देवून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा नियम भंग करून शासकीय कर्तव्यात कसूर केल्याने पुढील आदेश होईपर्यंत हिंगे यांना सक्तीचे रजेवर पाठविण्यात आले.

Protected Content