जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील २६ वर्षीय तरूणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने ते नैराश्यात होते यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनराज संतोष जाधव (वय-३६, रा. जळके ता.जि.जळगाव ) हा तरूण हे मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. पत्नी दोन मुले व मुलगी असा त्यांचा परिवार आहे. पत्नी सीमा ही दोन दिवसांपूर्वी मुलासंह माहेरी जळगाव जामोद येथे गेली आहे. त्यामुळे धनराज हे घरी एकटेच होते. आज सोमवारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. ते राहत असलेल्या परिसरात गावातच त्यांची आई वडील आणि भाऊ राहतात. आईवडील सायंकाळी शेतातून घरी परतल्यानंतर त्यांना धनराज याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसुन आले. घटनेची माहिती मिळाल्यावर जळकेकर महाराज यांच्यासह पोलिस पाटील संजय चिमणकर यांनी घटनास्थळ गाठले व धनराज यास जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जामुळे धनराज हे काही दिवसांपासून नैराश्यात होते त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात होते.