जळगाव, प्रतिनिधी । पाळधी ता. जामनेर येथील शेतकरी यांची कमानी तांडा योजनेअंतर्गत प्रकल्पात १९९९-२००० साली शासनाने जमीन संपादित करण्यात आली होती. या संपादित केलेल्या जमिनीचा वाद कोर्टात गेला असता कोर्टाने शेतकरी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. परंतु, शासनाने अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही. याबाबत लवकरात लवकर मोबदला मिळावा अन्यथा शेतकरी उपोषणास बसणार असल्याचा इशारा लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. सी. अहिरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.
निवेदनाचा आशय असा की, आमची शेतजमीन भूसंपादन प्रस्ताव क्रमांक ७२/०५ अन्वये संपादित करण्यात आली आहे. या केस संदर्भात दिवाणी न्यायालयात निकाल जाहीर झाला असून या निकाला विरुद्ध औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात लघु पाटबंधारे विभाग मार्फत अपिलाची कार्यवाही करण्यात आली आहे. सदरील अपिलात अजूनपर्यंत कोणतेही आदेश शेतकरी यांच्या विरुद्ध कोर्टाने दिलेले नाही. तरी आपल्या कार्यालयातून आम्हाला जळगाव कोर्टाने मंजूर केलेला मोबदला आम्हास दिलेला नाही. या निकाल लागून ५ ते ६ वर्षाचा कालावधी झालेला असून देखील आपल्या कार्यालयातून कोणतीही कार्यवाही आपण केलेली नाही. तरी आपण २४ तारखेच्या आत आम्हाला आमचा मोबदला देण्यात यावा नाहीतर आम्ही सर्व शेतकरी २४ तारखेपासून आपल्या कार्यालय समोर उपोषण बसणार असल्याचा इशारा शेतकरी यांनी दिला आहे. या निवेदनावर समाधान संतोष पाटील, सोपान शामराव सोनवणे, दिलीप संतोष पाटील, संजय भाऊलाल बडगुजर, शालिक उखा बाविस्कर, नाना भागवत पाटील, कैलास बाबुलाल शेवाळे, तसेच इतर शेतकरी यांच्या सह्या आहेत.