कोलकाता : वृत्तसंस्था । जनतेच्या हितासाठी मी पंतप्रधान मोदींचे पाय धरायलाही तयार आहे, मात्र सूडाचे राजकारण बंद करा. असं ममता बॅनर्जींनी आज पत्रकारपरिषदेत म्हटलं आहे.
यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पाहणी नंतर घेतलेल्या आढावा बैठकीस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशीराने आल्याने, पंतप्रधानांना वाट पाहावी लागल्याचे समोर आले. या मुद्यावरून आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी व मोदी सरकारमध्ये नव्या वादाला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. या संदर्भात भाजपाकडून टीका होऊ लागल्यानंतर आता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून देखील प्रत्युत्तर दिलं गेलं आहे.
स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पंतप्रधान मोदींवर आरोप देखील केले आहेत. ही बैठक मला अपमानित करण्यासाठी होती. मी पंतप्रधान मोदींना वाट पाहायला नाही लावली, उलट मलाच पंतप्रधानांना भेटण्यासाठी वाट पाहावी लागली, असं ममता बॅनर्जींनी सांगितलं आहे.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “मला वाईट वाटलं. पीएमओने प्रसारित केलेली एकतर्फी माहिती चालवून त्यांनी माझा अपमान केला. जेव्हा मी काम करत होते, तेव्हा ते हे करत होते. जनतेच्या हितासाठी मी तुमचे पाय धरायला तयार आहे. मात्र हे सूडाचे राजकारण थांबवा.”
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, अशाप्रकारे माझा अपमान करू नका. बंगालला बदनाम करू नका. माझे अधिकारी प्रत्येक वेळी बैठकीत सहभागी होत आहेत. ते केंद्रासाठी काम करत आहेत, ते राज्यासाठी कधी नोकरी करणार? तुम्हाला वाटत नाही का? हा राजकीय प्रतिशोध आहे.” असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.
“आमची काय चूक होती? मागील दोन वर्षांत विरोधी नेत्यांची का आवश्यकता भासली नाही किंवा गुजरातमध्ये विरोधी पक्ष नेत्यांना बैठकीत का बोलावलं जात नाही? जेव्हा मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत भाष्य केलं व केंद्राची पथकं पाठवली गेली होती.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बोलून दाखवलं.