पारोळा प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जळगाव जनता सहकारी बँकेने ग्राहकांसाठी ‘एटीएम ऑन व्हील’ ही सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिली असून तालुक्यातील शेतकर्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे.
पारोळा शहरासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या ही दिवसगणित वाढत आहे. त्यातच जळगाव जनता सहकारी बँक, शाखा पारोळा असलेल्या परिसरात कोरोणाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी त्या बँक खातेदारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. जनता सहकारी बँकेने ग्राहकांची ही अडचण पाहता बँक वतीने ‘एटीएम ऑन व्हील’ ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात एटीएम मशीन व्हॅनमध्ये ठेवून ते ठराविक परिसरात घेऊन जात आहेत. त्यात ग्राहकांना आप आपल्या खात्यातून पैसे काढण्याची मोठी मदत होत आहे. बँकेच्या या शहरातील संदेश केंद्र समोरील उपक्रमाला आज पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एकूण वीस लाख रुपये संबंधित ग्राहकांनी आप आपल्या खात्यामधून आज या एटीएम मधून काढले आहेत. यात बहुतांश शेतकर्यांचा भरणा आहे. पीक कर्ज हे मंजूर झाले असले तरी बँकने ते पैसे एटीएम द्वारे काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचा उपयोग आज या सेवेतुन झाला आहे. याप्रसंगी बँकेचे मॅनेजर भदाणे व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. इतर बँकांनी देखील अशीच सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.