‘जनता कर्फ्यू’ला फैजपूरसह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आज (रविवार) पाळण्यात येत असलेल्या ‘जनता कर्फ्यू’ला फैजपूरसह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वयंस्फूर्त संचारबंदीमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट अनुभवायला मिळत आहे. फैजपूर शहरात नेहमी वर्दळीचा भाग असलेल्या सुभाच चौकात आज ‘ जनता कर्फ्यु’मुळे पूर्ण शांतता होती.

जीवघेण्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज फैजपूर शहरासह परीसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झालेले दिसत होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापा-यांनी आपली दुकाने बंद केली होती. चौका-चौकांमध्ये पोलीस कर्मचारी पाहायला मिळत असून खासगी दुचाकी किंवा खासगी मोटारींची अत्यंत तुरळक वाहतूक पाहायला मिळत आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे तपासून सोडण्यात येत आहे. कोरोनाच्या संकटाची पुरेशी जाणीव झाली असल्यामुळे नागरिकांकडून जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वजण आपापल्या घरी किंवा आहे त्या ठिकाणी थांबल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे पोलिसांनाही नागरिकांना घरी पिटाळण्याचे काम उरले नसल्याचे पाहायला मिळत आहे.

फैजपूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला असुन स्वत: पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण सकाळपासून कर्मचार्‍यांबरोबर शहरात फिरून नागरिकांना बाहेर न येण्याचे आवाहन करत होते.

Protected Content