भुसावळ, प्रतिनिधी । मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड न बाळगता तिचा अभिमान बाळगावा. शिकणे आणि जगणे यांची भाषा जर एक असेल तर जीवन जगणे सुकर होत असते. त्यामुळे मातृभाषेतून अध्ययन-अध्यापन आवश्यक असल्याचे प्रतिपादन दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “मनक्या पेरेन लागा” या कवितेचे कवी वीरा राठोड यांनी केले.
जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्रात झूम ॲपच्या माध्यमातून कवी वीरा राठोड यांनी चौथे पुष्प गुंफून संवाद साधला. ते सध्या चाळीसगावनिवासी असल्याने आपल्या खान्देशवासीयांसाठी ही बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यांचा परिचय मराठी भाषा बालभारती अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी करून दिला. त्यानंतर श्री. राठोड संवाद यांनी काव्यनिर्मितीची प्रक्रिया आणि कवितेचा आशय यासंदर्भात तब्बल दोन तास संवाद साधला. ते म्हणाले की, समाजपरिवर्तनासाठी लेखक आपल्या साहित्यातून योगदान देत असतो. त्याच्या जगण्याचा शोध हा कायम सुरू राहत असल्याने तो काव्यनिर्मितीची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवत असतो. अंतर्बाह्य जगाचा शोध घेऊन काव्याचे बीज कागदावर येत नाही तोपर्यंत लेखकाला ती बाब पीडादायक ठरत असते. परंतु, एकदा काव्यनिर्मिती झाली की, लेखकाचे मन हलके होऊन तो आनंदी होतो. त्यामुळे काव्यनिर्मितीची प्रक्रिया जशी पीडादायक आहे तशी आनंददायी सुद्धा आहे. “मनक्या पेरेन लागा” ही बंजारी बोलीभाषेतील कविता आणि तिचे विनायक पवार यांनी “माणसं पेरायला लागू” यात केलेले भाषांतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे. निसर्गाची प्रचिती, लढण्याची ऊर्मी व मनात शेतातील रोपटे घर करून राहिल्याने ही काव्यनिर्मिती झाली.आयुष्याची पेरणी करण्याचा विचार आला आणि त्यातूनच माणसे पेरावी म्हणजेच जोडावी लागणार हे या कवितेतून सांगितले. सध्या माणूस स्वार्थी व आत्मकेंद्री बनत चालला असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला माणसे पेरावी लागणार आहेत. यासाठी निर्मितीची शक्यता, लढण्याचे बळ आणि निसर्गाशी असलेले नाते विद्यार्थ्यांना सांगितल्यास ते नक्कीच आपल्या आयुष्यात यशस्वी होतील, असेही श्री. राठोड यांनी सांगितले. त्यानंतर शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. ऑनलाईन संवाद सत्राचे आभार दीपक चौधरी यांनी मानले.