सुकमा (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले आहेत. तर १४ जवान गंभीर जखमी झाले आहेत.
एल्मागुंडा परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिती संयुक्त टीमला मिळाली होती. यानंतर चिंतागुफा, बुर्कापाल आणि टिमेलवाडा भागात मोठी कारवाई सुरू झाली. संयुक्त टीम एल्मागुंडाजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला संयुक्त टीमनंदेखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले. तर तितकेच जखमीदेखील झाले. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्रसाठा पळवला. बस्तरमध्ये याआधी अनेकदा नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले आहे. मात्र डीआरजीवरील (जिल्हा राखीव दल) हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. हल्ल्यात शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १२ जवान डीआरजीचे आहेत. यामध्ये एके-४७, इंसास, एलएमजीचा समावेश आहे. कालपासून काही जवान बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी १५० सुरक्षा अधिकारी रवाना झाले होते. अखेर आज १७ जवानांचे मृतदेह हाती लागले.