चोपडा प्रतिनिधी । येथील शिवसेनेतील गटबाजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमातून उघड झाली आहे.
चोपडा शिवसेनेमध्ये माजी आमदार कैलास पाटील आणि विद्यमान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यात अनेक महिन्यांपासून वाद सुरू असल्याची चर्चा होती. यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी बाजार समितीच्या सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी बोलतांना कैलास पाटील यांनी विद्यमान आमदारांवर जोरदार टीका केली. आम्ही रात्रंदिवस फिरुन आमदार चंद्रकांत सोनवणे यांना निवडून आणले. मात्र, आपल्याशी गद्दारी झाली. आगामी निवडणुकीत अनेक उमेदवार आपल्याकडे आहेत. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी मिळवून देऊ असा दावादेखील त्यांनी केला.
कैलास पाटील पुढे म्हणाले की, सन २०१४ च्या निवडणुकीत संपूर्ण तालुका नाही म्हणायचा. मात्र सुरेशदादा जैन, मंत्री गुलाबराव पाटील, बळीराम सोनवणे यांनी विनंती केल्याने तालुक्यात आपण, तसेच इंदिरा पाटील आदींनी रात्रंदिवस फिरुन आमदार सोनवणे यांना निवडून आणल्याचे सांगितले. आता मात्र ही चूक सुधारून आगामी विधानसभेत सेनेतर्फे रामचंद्र भादले यांना संधी देऊ असे सूतोवाच कैलास पाटील यांनी केले. एवढेच नव्हे तर आपल्याकडे दुसरा आणि तिसरा उमेदवारही तयार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.