चोपडा प्रतिनिधी । वनांचल समृद्धी अभियानतर्फे समाजकार्य महाविद्यालयात सामूहिक वनाधिकारी प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.ईश्वर सौदानकर यांच्याहस्ते भारत माता व स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा पुजनाने झाले.
ग्रामविकासाचे मॉडेल असलेल्या बारीपाडा गावावर आधारित चित्रफित सर्वांना दाखवली. तसेच सामुहिक वनहक्क कायदा त्यातुन मिळालेले अधिकार व वाढलेल्या जबाबदाऱ्यांविषयी प्रा.मारुती गायकवाड यांनी सांगितले. प्रास्ताविक वसाचे उत्तर महाराष्ट्र विभाग समन्वयक स्वप्निल चौधरी यांनी केले.
आपल्या तालुक्यातील आदिवासी बांधवांना त्यांच्या दैनंदिन गरजा व आजच्या आधुनिक युगातील विकासाच्या वाटेवरचा वाटसरू करण्यासाठी वनांचल समृद्धी अभियान (वसा) या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून कामकाज सुरु आहे.मनरेगा या योजनेच्या माध्यमातून संस्थेने जनसंपर्क अभियान राबवून रोजगाराच्या शोधात असलेल्या बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच त्या विषयी मनरेगा प्रशिक्षण शिबीर घेऊन वेगवेगळ्या गावांमध्ये जनजागृती केली. पुढील टप्प्यात आम्ही सामुहिक वनहक्क प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरुन या प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातून ज्या आदिवासी गावांना सामुहिक वनहक्क प्राप्त झाला आहे त्यांना त्या जंगलाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रवृत्त करीत व त्यातील गौण वनउपज च्या माध्यमातून त्यांचा उपजिविकेचा प्रश्नही सुटेल असा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन जिल्हा समन्वयक शुभम नेवे यांनी केले.
प्रशिक्षण शिबीराला जवळपास १५ गावांमधून आदिवासी बांधव उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवे यांनीही उपस्थित दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम नेवे, अमोल पाटील, मल्हार पाटील यांनी परीश्रम घेतले.