चोपडा येथील ‘प्रेरणा दर्पण फाऊंडेशन’चा मदतीचा हात

चोपडा प्रतिनिधी । शहराच्या विविध भागात राहणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरापर्यंत, वस्तीपर्यंत, रस्त्यावर फिरणाऱ्या बेघारांपर्यंत पोहोचून प्रेरणा दर्पण फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे वितरित केली.

सामाजिक संस्थांनी जर आपले उत्तरदायित्व खऱ्या अर्थाने निभावले तर त्याचा समाजात एक सकारात्मक परिणाम दिसून येतो. असाच काहीसा प्रत्यय सध्या चोपडा शहरवासी घेत आहे.


कोरोना विषाणूमुळे जगभर पसरलेल्या आजारामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन उपासमार टाळण्यासाठी त्यांच्या जेवणाची सोय गेल्या पाच दिवसापासून येथील प्रेरणा दर्पण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
शहराच्या विविध भागात राहणाऱ्या कष्टकऱ्यांच्या घरापर्यंत, वस्तीपर्यंत, रस्त्यावर फिरणाऱ्या बेघारांपर्यंत पोहोचून फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अन्नाची पाकिटे वितरित केली. सुमारे ३३० जणांपर्यंत ही अन्नाची पाकिटे व्यवस्थित पोहचवण्यात आली. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी विविध सेवांमध्ये व्यस्त असलेल्यांचा देखील यावेळी विचार करण्यात येऊन त्यांनादेखील अन्नाची पाकिटे कार्यकर्त्यांनी वितरित केली. याप्रसंगी माजी आमदार जगदीशचंद्र वळवी, शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. विनायक लोकरे यांच्या हस्ते गरजूंना अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. शहरातील नगर परिषदेमागील वस्ती, परीस पार्क, महालक्ष्मी नगर, गुरुकुल नगर, शरदचंद्रिका पाटील कॉलनी, कारगील चौक, अरुणोदय कॉलनी या परिसरात झोपड्यांमध्ये राहणाऱ्या मजूर व त्यांच्या कुटुंबीयांना ही पाकिटे वितरित करण्यात आली. शहरातील काही दानशूर व्यक्तींनी देखील या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केलेला आहे. दि. ३० रोजीच्या जेवणासाठी चोपडा नगरपरिषदेचे स्वच्छतादूत व ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. विकास हरताळकर यांनी आर्थिक सहकार्य केले. हे कार्य या संकटसमयी विना अडथळा सुरू राहावे यासाठी अनेकांनी सहयोग देण्यासंदर्भात फाऊंडेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
प्रेरणा दर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जाधव, उपाध्यक्ष डॉ. निर्मल जैन, सचिव लतिश जैन, सहसचिव संजय बारी, हिरेंद्र साळी, विश्वास वाडे, अतुल पाटील, निलेश जाधव, अॅड. अशोक जैन, आकाश जैन हे याकामी परिश्रम घेत आहे.

Protected Content