चोपडा महाविद्यालयात भूगोलशास्त्र विभागातर्फे भूगोल दिन मार्गदर्शन व पारितोषिक वितरण

chopda

चोपडा प्रतिनिधी । येथील कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागातर्फे भूगोल दिन मार्गदर्शन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी तर मार्गदर्शक म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे भूगोलशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.व्ही.जे. पाटील हे होते.

याप्रसंगी व्यासपीठावर भूगोलशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख श्रीमती आशा पोतदार, विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. एन. एस कोल्हे, उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे व डॉ. शैलेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वसुंधरा पूजन व स्वागत गीताने झाली. प्रास्ताविक प्रा. एन. एस.कोल्हे यांनी केले.

प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हणाले, की भूगोल दिन साजरा करण्याचे औचित्य म्हणजे भूगोलशास्त्र विषयात विशेष योगदान देणारी प्राध्यापक सी.डी.देशपांडे यांचा जन्मदिन , तसेच सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत होणारे संक्रमण आणि हॅले धूमकेतू चा शोध लावणारे शास्त्रज्ञ हॅले यांचा मृत्यू इ. घटनांचा आधार सांगितला. भूगोलाचा अभ्यासक म्हणून दैनंदिन जीवनात सामाजिक बांधिलकी जपतांना अंधश्रद्धा दूर करणे आणि निसर्ग प्रती आदर राखतांना प्रत्येक दिवस भूगोल दिन म्हणून साजरा करता येतो . भूगोलशास्त्राचा अभ्यासक म्हणून आपण नेहमी विचारांनी तरुण असावे, पारंपरिक ज्ञानाला नावीन्यतेची झालंर चढवावी, निसर्ग नियमांचे-आज्ञेचे पालन करावे, समाज उपयोगी कार्य करताना शाश्‍वत विकासाकडे वाटचाल करावी आणि सत्याची कास धरून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडावे अशी आशा व्यक्त केली. भूगोलातून घेतलेल्या शास्त्रोक्त ज्ञानाने आविष्कार घडवून त्यातून पारंपारिक परंपरांना तिलांजली देण्याचे काम करावे, तसेच लहान-लहान पर्यावरणपूरक कृतीतून संदेश देण्याचे आणि सोबतच काळ व स्थळ सापेक्ष बदलणारे सत्याचा उलगडा करण्याची, धांडोळा घेण्याची जबाबदारी भूगोलाच्या विद्यार्थ्यावर आल्याचे जाणीवपूर्वक नमुद केले.

त्याचप्रमाणे सदुर संवेदन हे ज्ञानाचे क्षेत्र म्हणजे आधुनिक युगातला रोजगाराचं भव्य प्रवेशद्वार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. भूगोलशास्त्र विषय हा स्पर्धात्मक युगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करून स्वावलंबी बनविणारा आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारा असल्याचे अधोरेखित केले, आणि एक सजग, जागरूक नागरिकांना आत्मपरिक्षण करायला लावणारी पर्यावरण पूरक दशसूत्री सभागृहा कडून वदवून घेतली.

भूगोल दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भौगोलिक सामान्यज्ञान परीक्षेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी कनिष्ठ विभागातून बक्षिसाचे मानकरी अनुक्रमे प्रथम अर्जुन दादा शिंदे, द्वितीय कोमलसिंग जयराम जाधव, तृतीय जागृती राजेंद्र बाविस्कर आणि उत्तेजनार्थ भूषण किशोर पाटील व माया रवींद्र धनगर हे ठरले. तसेच वरिष्ठ गटातून प्रथम स्वरांगी वसंत अहिरे, द्वितीय कविता कैलास धनगर, तृतीय गणेश भगवान पाटील व उत्तेजनार्थ तेजस शैलेश वाघ यांनी बक्षीस प्राप्त केले. त्याचप्रमाणे आय. आय. आर. एस.-इस्त्रो आणि महाविद्यालयाचे भूगोलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी २०२० रोजी आयोजित एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना भूगोलशास्त्र विभागाच्या उपक्रमांचे भरभरून कौतुक केले आणि विभागाच्या भावी यशस्वी वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश वाघ यांनी केले व आभार संगिता पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पी.एस.पाडवी, सौ. ए. पी. लांडगे, मुकेश पाटील,सौ.संगीता पाटील, अभिजीत पाटील, मोतीराम पावरा, मनीष पावरा, किशोर निकम आणि विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Protected Content