चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयाचा टाटा समूहासोबत नोकरी विषयक महत्वाचा करार झाला आहे.
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट सेल तर्फे विद्यार्थ्यांसाठी नोकरी मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. स्मिता पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शक सुबोध जाधव, देवेंद्र निमोळकर, वीरेंद्र यादव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, डॉ.के.डी.गायकवाड (समन्वयक, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट सेल) आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी टाटा स्ट्राईव्ह समूहाचे सुबोध जाधव यांनी डॉ.स्मिता संदीप पाटील यांना विद्यार्थ्यांच्या नोकरीसंदर्भात महत्वपूर्ण करारपत्र सुपूर्द केले. या करारामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगाराची नव्या संधी उपलब्ध होतील. या दोन दिवशीय नोकरी मेळाव्यात एकूण ५१५ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली त्यातून १७१ विद्यार्थ्यांची टाटा स्ट्राईव्हच्या नाशिक, पुणे व मुंबई या तीन शाखांमध्ये निवड झाली.
प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करून संधी उपलब्ध करून दिल्या जातात. आजच्या आधुनिकतेच्या व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून त्यांच्यात रोजगाराभिमुख कौशल्य रुजविण्यासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. प्रमुख मार्गदर्शक सुबोध जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रचंड वाढलेल्या बेरोजगार तरुणांपुढे रोजगारासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी आजच्या तरुणांनी आपल्यातील संवाद कौशल्य व इतर कौशल्यांचाही विकास करणे काळाची गरज आहे.
डॉ.स्मिता पाटील म्हणाल्या की, व्यक्तिमत्व विकास हा रोजगारासाठी महत्वपूर्ण ठरणारा घटक आहे. कार्यकुशलता, जिद्द, उत्तम संवाद कौशल्य, भाषेचे उत्तम ज्ञान या गोष्टींचा विकास विद्यार्थ्यांनी केल्यास सहजपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यादृष्टीने महाविद्यालयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन आपले भविष्य उज्वल करायला हवे.
आभार डॉ.के.डी.गायकवाड यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.एस.बी.पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी एम.एल.भुसारे, डॉ.पी.एम.रावतोळे, डी.डी.कर्दपवार, मयूर ए. पाटील, एस.बी.पाटील, ए.एच.साळुंखे, डॉ.एच.जी.सदाफुले यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.