बीजिंग : वृत्तसंस्था । चीनमध्ये बीजिंगसहित १५ शहरात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे.
चीन करोनावर मात करण्यात यशस्वी ठरल्याचं भासवत होता. मात्र काही दिवसात चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जवळपास २.२ कोटी लोकसंख्या असलेल्या बीजिंगमध्ये १ जुलैला चीनी कम्युनिस्ट पार्टीचा शताब्दी सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी गेले कित्येक महिने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता बीजिंगमध्ये रुग्ण आढळल्याने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी तातडीची बैठक बोलवून उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.
पूर्व चीनमधील जिआंगसू प्रांताची राजधानी असलेल्या नानजिंग विमानतळावरील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर वेगाने फैलाव झाला आहे. २० जुलैला जवळपास २०० जणांना लागण झाली होती. त्यानंतर ११ ऑगस्टपर्यंत या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्यात आली आहे. वाढते रुग्ण पाहता या भागात अंशत: निर्बंध लादण्यात आले आहेत.
नानजिंग विमानतळावर कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हा फैलाव झाल्याचं आरोग्य विभाागचं म्हणणं आहे. १० जुलैला रशियातून चीनमध्ये आलेल्या विमानात हा कर्मचारी कार्यरत होता सफाई कर्मचाऱ्याने नियम पाळले नसल्याने फैलाव झाल्याचं झिनुआ न्यूज रिपोर्टने सांगितलं आहे. स्थानिक प्रशासनाने विमान प्राधिकरणाला जबाबदार धरलं आहे.
चीनमध्ये फैलाव वेगाने होत असल्याने चीन निर्मित लसीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटवर ही लस अकार्यक्षम असल्याचं बोललं जात आहे. त्यात किती जण लस घेऊनही संक्रमित झाले आहेत, याबाबतची माहिती नाही. दुसरीकडे दक्षिण-पूर्व आशियाई देशांनी चीनची लस घेणार नसल्याचं जाहीर केलं आहे.