बीजिंग: वृत्तसंस्था । कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवलेल्या चीनमधील तीन शहरांमध्ये कोरोनाबाधित आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्रशासन सतर्क झाले आहे. लाखो नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
चीनमधील शांघाय, तिआनजिन, मंझौली या शहरांमध्ये बाधित आढळले. शांघायमध्ये तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. विमानतळ, रुग्णालये आदी ठिकाणी काम करणाऱ्यांची दररोज तपासणी केली जात आहे. तिआनजिनमधील बिन्हाईमध्ये पाच रुग्ण समोर आल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी २२ नागरिकांची चाचणी केली. मंझौलीमध्ये दोन बाधित आढळल्यानंतर सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. या शहराची लोकसंख्या दोन लाखाच्या आसपास आहे. शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून सार्वजनिक ठिकाणी जमाव करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
अनेक तज्ज्ञ आणि सरकारी अधिकाऱ्यांनी थंडीच्या दिवसांत संसर्ग फैलावण्याचा अधिक धोका असल्याचे सांगितले. चीनमध्ये पुन्हा संसर्ग फैलावण्याचा धोका आहे. चीनमध्ये आतापर्यंत एकूण ८६ हजार ४४२ बाधित आढळले असून ४६३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
युरोपीयन देशांमध्ये दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे युरोपमधील जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे.
संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही लशी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्नानंतर आता चीनची ‘करोनावॅक’ लसही प्रभावी ठरली असल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या चाचणीत ही लस सुरक्षित असल्याचेही सांगण्यात आले आहे.
चीनमधील सिनोवॅक कंपनीने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. ‘लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज’ या वैद्यकीय नियतकालिकात या चाचणीचे संशोधन प्रकाशित झाले आहे. सिनोवॅकच्या ‘करोनावॅक’ची लस टोचल्यानंतर २८ दिवसांमध्येच लोकांमध्ये अॅण्टीबॉडीज तयार होत असल्याचे समोर आले आहे. चीनच्या जियांग्सू प्रॉव्हिशियल सेंटर फॉर डिसीस कंट्रोलच्या संशोधकांनी सर्वाधिक अॅण्टीबॉडीज तयार करणारा डोसचा शोध लावला असल्याचा दावा केला आहे.