“कोविशील्ड” देण्याच्या जागेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जळगाव प्रतिनिधी । अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली सिरम इन्स्टिट्यूट, पुणेची “कोविशील्ड” लस हि जळगाव शहरात बुधवारी १३ रोजी संध्याकाळी ७ वाजता पोहोचली. कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासह पाहणी करून जागा निश्चिती केली. पहिल्या दिवशी जिल्ह्यात ९ केंद्रावर प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे. त्यावर उपाय म्हणून पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने “कोविशील्ड” लशीची निमिर्ती केली आहे. जळगाव जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी ६ वाजता पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, आरएमओ डॉ. विजय जयकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत यांनी महाविद्यालयाचा व रुग्णालयाचा परिसर पहिला. त्यात नेत्रकक्ष, अधिष्ठाता कार्यालय परिसर, एआरटी सेंटर, रुग्णालय परिसर, अपघात,ओपीडी विभाग पाहून चर्चा केली. परिसरातील सुशोभीकरण, अद्ययावत वाहन पार्किंग सुविधा तसेच रुग्णालय व्यवस्थापन पाहून समाधान व्यक्त करीत प्रशंसा केली. त्यानंतर ओपीडी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात जाऊन कोविशील्ड लस देण्याची जागा निश्चित करून जिल्हा शल्यचिकीत्सक व अधिष्ठाता यांच्याकडून नियोजन जाणून घेतले. पहिल्या दिवशी वैद्यकीय अधीक्षकांच्या कक्षात १०० कर्मचाऱ्यांना या ठिकाणी कोविशील्ड लस दिली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांचा डाटा ठेवून त्यांना पुन्हा २८ दिवसांनी लसीकरण केले जाणार आहे.

जिल्ह्यात २४ हजार ३२० कोरोना लस जिल्ह्यात येत आहेत. सध्या ६० टक्के कर्मचाऱ्यांना लसीकरण होईल. सुरुवातीस ९ केंद्रावर लस देण्यात येतील. ८ जानेवारी रोजी कोवीड लसीकरणाबाबतची रंगीत तालीमही “शावैम” मध्ये झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रातील १४ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहेत.एक लस हि ५ एमएलची असेल. एका कुपीत १० डोस अशी कोविशील्डची रचना आहे. १६ जानेवारी रोजी जामनेर, मुक्ताईनगर, चोपडा या तीन उपजिल्हा रुग्णालयात, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा या तीन ग्रामीण रुग्णालयात तर जळगाव शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नानीबाई अग्रवाल रुग्णालय, जैन रुग्णालय,शिवाजीनगर असे एकूण नऊ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

कोव्हीशिल्ड लस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली औषधशास्त्र निर्माण विभागात अधिक्कारी सुरेश मराठे यांनी तपासणी करून ताब्यात घेतले.

Protected Content