चीनने भूमिका बदलली ; आता तालिबान्यांना दहशतवादविरोधी लढाईचा सल्ला

 

बीजिंग : वृत्तसंस्था । चीनने सुरक्षा परिषदेचे उप स्थायी प्रतिनिधी गेंग शुआंग यांनी तालिबानला सांगितले की, तुम्ही शांततेत राज्य करा पण अफगाणिस्तानला दहशतवादी गटांचे आश्रयस्थान बनू देऊ नका.

 

तालिबानने सर्वसमावेशक इस्लामिक सरकार स्थापन करण्याचे आणि अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही तासांनी चीनने एक चेतावणी जारी केली आहे.  अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीदरम्यान शुआंग यांनी हे वक्तव्य केले.

 

गेंग शुआंग म्हणाले, आम्हाला आशा आहे की अफगाणिस्तानातील तालिबान आपली वचनबद्धता प्रामाणिकपणे पूर्ण करेल आणि दहशतवादी संघटनांपासून पूर्णपणे मुक्त होईल. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदे आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांनुसार आपली जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. इस्लामिक स्टेट, अल-कायदा सारख्या दहशतवाद्यांशी लढण्यासाठी एकमेकांसोबत काम केले पाहिजे. यावर कठोर कारवाई केली पाहिजे.

 

त्यांनी पूर्व तुर्कस्तान इस्लामिक चळवळीबद्दल इशाराही दिला. ते म्हणाले की ही दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय होऊ शकते, त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ईटीआयएम चीनच्या अस्थिर शिनजियांग प्रांतातील अल-कायदा या अतिरेकी गटाचा सहयोगी असल्याचे म्हटले जाते. हे १० दशलक्ष उईघुर मुस्लिमांचे निवासस्थान असलेल्या प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. UNSC अल-कायदा प्रतिबंध समितीने २००२ मध्ये ETIM ला दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध केले.

 

यापुर्वी सोमवारी चीनने तालिबानशी ‘मैत्रीपूर्ण संबंध’ प्रस्थापित करण्यास तयार असल्याचे म्हटले होते. आता चीनने भूमिका बदलली आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले होते की, “चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि अफगाणिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध विकसित करु इच्छितो.”

 

Protected Content