धरणगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोना पॉझिटीव्ह वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांनी दिली आहे.
कालपर्यंत (शनिवार) धरणगावात कोरोना विषाणूचा संसर्ग आढळून आला नव्हता. काही दिवसांपूर्वी खत्री गल्लीतील रूग्णाचा स्वॅब रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तर यानंतर पारधी वाड्यातील मृत झालेल्या तरूणाचा स्वॅब रिपोर्ट पाठविण्यात आला असून याचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील लहान माळीवाडा,नवेगाव व चिंतामण मोरया परिसरात वास्तव्य असलेल्या एका वृध्द महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याची माहिती शनिवारी रात्री उशिरा समोर आली होती. परंतू आज सकाळी या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली. त्यामुळे तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना बाधित महिलेचा स्वॅब सँपल १३ तारखेला घेण्यात आल्याची माहिती कळतेय. प्रशासनाने रात्रीच संबंधित परिसर सील करत अत्यावश्यक सेवा वगळता येथे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी बंदी घातली आहे.
धरणगावातील वृध्द महिलेवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू असून तिच्या संपर्कातील लोकांना आवश्यकतेनुसार क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. अगदी गरज भासल्यास काहींची स्वॅब चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. शहरातील परिस्थितीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना गटनेते पप्पू भावे, नगरसेवक विलास महाजन हे लक्ष ठेवून आहेत.